उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात येत्या काही दिवसात तुरळक पावसाची शक्यता,हवामान खात्याचा अंदाज
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,वृत्तसंस्था। उत्तर भरतात सध्या कडाक्याची थंडी सुरू असून काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहेत. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्यानंतर, आज पुन्हा राज्यात 1 ते 2 अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच राज्यात सध्या ढगाळ स्थिती निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात एकीकडे थंडीचा कडाका सुरू असताना, खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 6 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र आगामी काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
6 जानेवारीनंतर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सकाळी धुके, तसेच मंद प्रकाश अशी स्थिती राहू शकते.
येत्या काही दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या भागात गारवा वाढू शकतो. हरियाणात पुढचे सातही दिवस थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. अलीकडेच तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात आणि आसपासच्या भागांत पावसानं थैमान घातलं आहे.