राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यावर खडसेंची आमदारकी जाणार? काय म्हणाले शरद पवार
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोडून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यामुळे त्यांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा होती. खडसे आमदारकीचा राजीनामा देणार काय या कडेही सर्वांचं लक्ष होतं मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नाही, असे मत व्यक्त केल्याने या विषयावर पडदा पडला आहे.
माजी मंत्री राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षात स्वगृही जाण्याचा निर्णय घेतल्या नंतर शरद पवार पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजपात जाण्यावर बोलले असून खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही असे स्पष्ट देखील केलं आहे. इतकचं नाही तर, एकनाथ खडसे यांना मीच तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटते, तिथे जा, असे सांगितले, त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, की त्यांना कुटुंब चालवणंसुद्धा अवघड करून टाकलं, असल्याचं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. दरम्यान खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्या नंतर शरद पवार म्हणाले नाही, कारण एकदा दिलेले मी परत घेत नाही, असेही पवार म्हणाले. स्वतः शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाराजी अथवा टीका केलेली नाही उलट विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.