बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा, ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी केली. यात ३ जणांना ताब्यात घेण्यात आले
आहे.
पारोळा तालुक्यात बहादरपूर बोरी नदीच्या किनाऱ्यावर एका लोखंडी पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदेशीर अवैध देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर-पवार यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. व या अवैध दारू कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी तयार आणि तयार होण्याच्या प्रक्रियेत असलेली मोठ्या प्रमाणात देशी दारू, कच्चा माल, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
कारखान्यात तयार विक्रीसाठी ३१०० सीलबंद बाटल्या (किंमत १ लाख २४ हजार रुपये, ७०० विक्रीपूर्व अवस्थेतील बाटल्या किंमत २८ हजार, ८०० लीटर स्पिरीट किंमत ३ लाख ५५ हजार, १५०० लीटर तयार दारू ,किंमत ३ लाख, RO व CNC मशिन्स, प्रत्येकी ५ लाख, पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, ३० हजार टँगो पंच बुच, ६१,२०० रिकाम्या बाटल्या ६ लाख १२ हजार रुपये, विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर्स, बोलेरो मालवाहू वाहन किंमत ५ लाख, स्विफ्ट डिझायर कार ५ लाख, तसेच लोखंडी पत्र्याचे ४० बाय ४० फुटांचे शेड किंमत ५ लाख , असा एकूण ४० लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, पोलीस हवालदार व अंमलदार महेश पाटील, शरद पाटील, प्रविण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे आणि चालक पोह. संजय पाटील व वेलचंद पवार यांच्या संयुक्त पथकाने केली.
या प्रकरणी राकेश जैन, टिंन्या डोंगऱ्या पावरा आणि कतार सिंग पावरा या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे काम कौतुकास्पद असले तरी, संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

