खिर्डी येथे वीज कंपनीने केला पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित, अंधाराचे साम्राज्य
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। यापूर्वी ग्रामीण भागातील पथदिव्यांचे विज बिल शासन भरत होते परंतु ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचा विचार करता वीज बिल भरणे अशक्य असल्यामुळे थकीत वीज बिल भरू शकत नसल्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु.आणि खिर्डी बुद्रुक या गावांमध्ये पथदिव्यांचे वीज कनेक्शन वीज कंपनीने खंडित केल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.
खिर्डी गाव पंचक्रोशीतील दहा ते बारा गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून मंगळवार रोजी येथे मोठा आठवडी बाजार भरतो परंतु गावातील पथदिवे बंद असल्यामुळे आजू बाजूच्या खेड्या पाड्यातून येणारे व्यापारी शेतकरी वर्गाची गैरसोय होत आहे.तसेच गावात रात्रीच्या वेळेला कामा निमित्त ग्रामस्थांना फिरताना विजे अभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वीज कंपनीने ग्रामपंचायतीकडे विज बिल भरण्यासंदर्भात तगादा लावलेला आहे.तसेच अंधाराचा गैरफायदा घेऊन चोऱ्यांचे प्रकार व गैरकृत्य वाढण्याची शक्यता जास्त असते या बाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेवून अंधाराचे साम्राज्य दूर करण्यात यावे तसेच रात्री बे रात्री बाहेर गावाहून येणाऱ्या कामगार व आबाल वृध्द लहान मुलांना घरी परततांना त्रास होत असल्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रात्रीच्या अंधारात मोकाट कुत्री, साप व विचू काट्याची नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचा विचार करता वीज बिल भरणे अशक्य असल्यामुळे यापूर्वी पथदिव्यांचे विज बिल जसे शासन भरत होते. त्याप्रमाणे येथून पुढे देखील हे पथदिव्यांचे बिल शासनाने भरावे,अशी मागणी ग्रामस्थांसह सुज्ञ नागरिकांनी केली आहे.