रावेर तालुक्यात तीन अवैध सावकारांवर छापे,परिसरात खळबळ
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे नऊ शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून तीन ठिकाणी अवैध सावकारांवर छापे टाकण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारीच्या तक्रारींवरून आज सकाळ पासून कुंभारखेड्यात उपनिबंधकांच्या निर्देशावरून तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा तसेच परिसरातील रहिवासी असणार्या नऊ शेतकर्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अवैध सावकारीबाबत तक्रारी केल्या होत्या.
आज सकाळीच सहकार खात्याच्या पथकांचा ताफा कुंभारखेडा येथील अशोक जगन्नाथ पाटील, अतुल अशोक पाटील आणि नितीन राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांनी घराचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. दुपारी साधारणपणे चार ते साडेचार त वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या छाप्यांमध्ये तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून कारवाईमध्ये जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या पथकात रावेर येथील सहायक निबंधक विजयसिंह गवळी यांच्या नेतृत्वाखाली इब्राहिम तडवी, धिरज पाटील, फकीरा तडवी आणि श्रीमती अनुजा बाविस्कर यांचा समावेश होता. तर, दुसर्या पथकात जामनेरचे सहायक निबंधक जगदीश बारी यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र गाढे, श्रीमती अरूणा तावडे, वाहीद तडवी आणि योगेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.
कुंभारखेड्यासह चिनावल येथील एकूण नऊ शेतकर्यांच्या तक्रारी अर्जावरून ही कार्यवाही करण्यात आली आहे. काय काय कागदपत्र जप्त करण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नसून या कागदपत्रांची छाननी करून तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.