सावदा दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमन पदी रवींद्र बेंडाळे तर कुशल जावळे व्हा.चेअरमन पदी बिनविरोध
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील “सावदा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित” सावदा. या दूध संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच अत्यंत शांततेत व एकमताने बिनविरोध पार पडली.
दिनांक ७ जून रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदासाठी सर्वानुमते श्री. रवींद्र श्रावण बेंडाळे यांची एकमताने निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री. कुशल सुरेंद्र जावळे यांची निवड करण्यात आली. या निवडींनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या सदस्य, कर्मचारी आणि संचालक मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या एकसंध आणि सहकारी संस्कृतीचा प्रत्यय या बिनविरोध निवडणुकीतून पुन्हा एकदा आला. नवीन कार्यकारिणीकडून संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, दूध उत्पादक सदस्यांच्या हितासाठी ठोस पावले आणि सहकार तत्त्वांचा आदर्श उभा राहील, असा विश्वास या वेळी अनेक सदस्यांनी व्यक्त केला.सावदा परिसरातील ही संस्था अनेक दशकांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरत आली आहे.
संस्थेच्या पुढील वाटचालीत ही नवी नेतृत्व टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही मत सर्वच स्तरांतून व्यक्त झाले. स्थानिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात सातत्याने सक्रिय राहणाऱ्या बेंडाळे आणि जावळे यांच्याकडून अधिक गतिमान आणि कार्यक्षम निर्णय अपेक्षित आहेत. नव्याने निवडून आलेल्या नेतृत्वामधून संस्थेची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पडेल, अशी आशा सदस्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे


