पोलिस अधिकारी असल्याचे सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला तब्बल १८ लाख २१ हजारांचा गंडा
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ‘डिजिटल अटक’ आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून मुक्ताईनगर येथील एका ७१ वर्षीय निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील मनोहर वसंत चौधरी (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांना १७ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकावरून फोन आले.फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख राज मल्होत्रा ‘डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चा प्रतिनिधी, संदीप रॉय/राव याने वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी मनोहर चौधरी यांना सांगितले की, त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे. चौधरी यांना खरे वाटून त्यांना भीती वाटावी म्हणून भामट्यांनी त्यांना व्हॉट्सअपवर न्यायालयाचे बनावट आदेश आणि खोटे पोलीस कागदपत्रे पाठवले.व त्या नंतर
त्यांना अटक टाळण्यासाठी ब्लॅकमेल करत मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या चौधरी यांनी १७ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी RTGS आणि NEFT द्वारे एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात वळते केले. सतत पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


