भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ येथील २५ लाख ४२ हजारांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा ; ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार, ६ आरोपी अटकेत

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५.४२ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गुरनं.२०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात, फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे ज्या कंपनीत (रॉयल कंपनी) खाजगी नोकरी करतात, त्याच कंपनीचा ड्रायव्हर, शाहीद बेग, हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी शाहीद बेगसह एकूण ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये रोख आणि ०३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

अधिक माहिती अशी की, दि.२८/१०/२०२५ रोजी रात्री २२:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन हे त्यांच्या कार्यालयातील २५,४२,०००/- रुपये एका बॅगेत घेऊन मोटार सायकलने (एमएच-१९-बीसी-५५८६) घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटार सायकलला धक्का दिला. फिर्यादीचा तोल गेल्यानंतर, आरोपींनी मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावली व ते मोटार सायकलवर बसून पळून गेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासाची चक्रे आणि गुन्ह्याची उकलः-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत, शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली.

‘टिप’ देणाराः- शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती.

कट रचणारेः- त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची ‘टिप’ त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली.

गुन्हा करणारेः- मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. घटनेच्या रात्री, या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला.

तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकला आहे, त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी ….

१. शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) मुख्य सूत्रधार / ड्रायव्हर

२. मुजाहिद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ) कट रचणारा

३. मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ) – कट रचणारा

४. अजहर फरीद मलक (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) प्रत्यक्ष लुटीतील आरोपी

५. अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) प्रत्यक्ष लुटीतील आरोपी

६. ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर) प्रत्यक्ष लुटीतील आरोपी

आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी क्र. १) शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. ५) अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये जप्त करण्यात आले असून, उर्वरित २,००,०००/-रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करणे आणि गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी, पोलिसांनी सर्व आरोपींना मा. न्यायालयाने दि.०३/११/२०२५ पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली असून सदरचा गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. हे करीत आहोत.

उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत, भुसावळ उपविभाग, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, स्था.गु.शा.जळगांव, पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अमलदार यांचे पथकातील श्रे.पो.उप.निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ.प्रेमचंद सपकाळे, पो.ना.श्रीकृष्ण देशमुख, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. राहुल वानखेडे, पो.कॉ. ईश्वर पाटील, चापोहेकों. दर्शन ढाकणे सर्व नेम. स्था.गु.शा. जळगांव तसेच श्रीमती. पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, पोहेकॉ. वाल्मीक सोनवणे, पाहेकॉ. सुधीर विसपुते, पो.हे.कॉ. जितु ठाकरे सर्व नेम. भुसावळ तालुका पो.स्टे., पोकॉ. योगेश माळी, पोकॉ. भुषण चौधरी, पो.कॉ. अमर अढाळे, पोकॉ. प्रशांत सोनार सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पो.कॉ. प्रमोद पाटील नेम. रावेर पो.स्टे. यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!