भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनंदुरबार

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी मुख्याध्यापक अमृत पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील ला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

नंदुरबार.मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास नंदुरबार पर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अमृत पाटील यांच्या मुलीला, ऋतुजा पाटील हिला मुंबई गुन्हे शाखेने नंदुरबार येथील तिच्या राहत्या घरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

परीक्षेपूर्वी ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नसंचातील तब्बल ७७ ते ७८ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. तसेच प्रश्न मिळवण्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून, या व्यवहाराच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.

व्हॉट्सअॅप चॅटमधून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे
ऋतुजा पाटील आणि तिच्या मैत्रिणीमधील व्हॉट्सअॅप संभाषण तपासासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या कालावधीत झालेल्या या संभाषणातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या संभाषणातून ऋतुजा, तिचे वडील अमृत पाटील, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील तसेच अन्य काही व्यक्तींमधील संपर्काबाबत तपास यंत्रणेला धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. मात्र, या संभाषणांची सत्यता आणि त्यातील दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

मुलीच्या परीक्षेसाठी १२ लाखांचा व्यवहार?
अमृत पाटील हे मुख्याध्यापक असल्याची प्राथमिक माहिती असून, मुलीला औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत मदत मिळावी यासाठी प्रश्न मिळवण्याकरिता त्यांनी सुमारे १२ लाख रुपये खर्च केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
यातील काही रक्कम कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आर्थिक व्यवहाराची तपासणी गुन्हे शाखेकडून सुरू असून, पैशांचा नेमका प्रवाह आणि त्यामागील उद्देश शोधला जात आहे.

काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला?
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आल्याची माहिती आहे. ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता असल्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला होता का, याचाही तपास केला जात आहे.


२९४ प्रश्नसंचातील प्रश्न बाहेर काढल्याचा संशय
तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या प्रश्नसंचातील तब्बल २९४ प्रश्न बाहेर काढण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यातील काही प्रश्न आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात काही परीक्षार्थींपर्यंत पोहोचवण्यात आले असावेत, अशी शक्यता तपासली जात आहे.
या २९४ प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न कोणत्या उमेदवारांना देण्यात आले, तसेच या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. व्हॉट्सअॅप चॅटमधून मयूर ठाकरेचे नाव पुढे
ऋतुजाच्या व्हॉट्सअॅप संभाषणातून मयूर ठाकरे याचे नावही तपासात पुढे आल्याची माहिती आहे. कथित पेपरफुटीच्या साखळीत त्याची काही भूमिका होती का, याची चौकशी केली जात आहे.


प्रवीण पाटील यांच्याकडून उर्वरित पैशांची मागणी होत असल्याने अमृत पाटील चिंतेत असल्याचे ऋतुजाने मैत्रिणीला सांगितल्याचे संभाषणातून दिसून येत असल्याची माहिती आहे. मात्र, या व्यवहाराचा नेमका उद्देश आणि त्याचा कथित पेपरफुटीशी थेट संबंध आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.


ब्रेकअपनंतर प्रकरण उघडकीस आल्याचा संशय
या प्रकरणात अटकेत असलेल्या गौरव उर्फ लोकेश पाटील याचे ऋतुजा पाटीलसोबत पूर्वी संबंध असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. परीक्षेनंतर दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती असून, ऋतुजाने लग्नास नकार दिल्यानंतर रागातून गौरवने कथित पेपरफुटीची माहिती उघड केली का, याचाही तपास सुरू आहे.
मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, गुन्हे शाखेकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.


सहा दिवसांत तिसऱ्यांदा तपास पथक नंदुरबारमध्ये
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेचे तपास पथक सहा दिवसांत तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले आहे. प्रकरणातील काही संशयितांना सोबत आणून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अमृत पाटील यांना सोबत घेऊन तपास पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. आता प्रश्नपत्रिकेतील प्रश्न नेमके कुठून बाहेर पडले, ते कोणाकोणापर्यंत पोहोचले, या प्रक्रियेत कोणाचा सहभाग होता आणि आर्थिक व्यवहाराची साखळी किती मोठी आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतरच कथित पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी आणि आर्थिक व्यवहाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!