सावदा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. ७-ब चे अपक्ष उमेदवार शाम अविनाश अकोले यांची बॅट चिन्ह अस्पष्ट असल्याची तक्रार
सावदा, ता. रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७-ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार अकोले शाम अविनाश यांनी आपल्याला वाटप करण्यात आलेले “बॅट” (क्रिकेट बॅट) हे निवडणूक चिन्ह ईव्हीएम मशीनवर अत्यंत अस्पष्ट व धूसर दिसत असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
श्री. शाम अकोले यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, “मला अपक्ष उमेदवार म्हणून बॅट हे निवडणूक चिन्ह वाटप झाले आहे. परंतु ईव्हीएम मशीनवर हे चिन्ह अत्यंत धूसर, लहान आणि अस्पष्ट दिसत आहे. इतर उमेदवारांची चिन्हे स्पष्ट व मोठ्या आकारात दिसताना माझे चिन्ह अंधारातही नीट दिसणार नाही. यामुळे मतदारांना मला मत देण्यात मोठी अडचण होईल आणि माझ्या निवडणुकीवर अन्याय होईल.”
त्या मुळे “निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणारी ही गंभीर बाब आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे बॅट चिन्ह ईव्हीएमवर इतर चिन्हांप्रमाणेच मोठे, स्पष्ट दिसेल अशी तात्काळ व्यवस्था करावी.”
सावदा नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागांत सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू असून प्रभाग ७-ब मध्ये अपक्ष उमेदवार अकोले शाम अविनाश यांच्यासह एकूण ६ उमेदवार रिंगणात आहेत. बॅट चिन्ह अस्पष्ट असल्याच्या या प्रकरणामुळे या प्रभागातील निवडणूक निकालावर परिणाम होईल का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
