धक्कादायक : स्कूल बस चालकाचा शेतात नेऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार !
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन तिच्यावर जबरजस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात घडली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात अबिद हुसेन शेख जलील (वय ३८) हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना त्याने ‘तू मला आवडतेस’ म्हणून पाठलाग करीत त्या पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
गुरुवार रोजी पीडित मुलीने पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे की, बसचालकाने माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच या मुलीला फोनवरून वारंवार धमकावत व अश्लील बोलत विनयभंग करीत होता. त्या नुसार अबिद हुसेन शेख जलील (वय ३८) या बसचालकाला अटक करून त्याच्याविरुध्द १९ ऑगस्ट रोजी पोलिसात बलात्कारासह पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संबंधित गावातून दररोज ५० ते ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूल बसने ये-जा करतात. त्यांचीही बसचालकाने या आधी छेड काढली काय? किंवा आणखी कोण्या मुलीशी गैरवर्तन करून अत्याचार केला आहे का? या बाबतही पोलिस कसून तपास करीत आहेत.


