खळबळजनक : डोक्यात दगड टाकून महिलेची हत्या, मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकला
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून हत्या करून मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आल्याची घटना
पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात घडली. ही घटना बुधवार रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अधिक वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत असताना त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. तसेच तिचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.
हा परिसर अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी अमळनेर पोलिस पोहोचले. त्यानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत असल्याची खात्री झाली. रात्री दहा वाजल्यानंतर पारोळा येथील पोलिस उपनिरीक्षक अमरदीप गोसावी हे पोलिस कॉन्स्टेबल अभिजित पाटील यांच्यासह पथक घटना स्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटलेली नव्हती. पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

