मोठी बातमी : “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुहूर्त दिवाळीत नव्हे, थेट पुढच्या वर्षात?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही मोठ्या संख्येने सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास ही निवडणूक होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी यापूर्वी दिलेल्या तारखेत राज्य शासनाने बदल केला आहे. यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसा शासनादेशही काढला आहे. हे सर्व ध्यानी घेतल्यास आता या निवडणुकीला नव्या मुहूर्त निघण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यतील सर्वच महापालिकां सह जवळ जवळ सर्वच नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हापरिषद, नगरपंचायती मध्ये कुठे तीन-साडेतीन तर कुठे पाच वर्षे अशा मुदती संपलेल्या आहेत . यावर प्रशासक राज सुरू आहे.
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामुळे सर्वच प्रक्रिया खोळंबली होती. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर अंतिम निर्णय अद्याप दिला नसला तरी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश धडकताच राज्यभर नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नोटिफिकेशनही काढण्यात आले होते. त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभाग रचनेचा मुसदा तयार करणे, २२ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी याप्रमाणे कार्यक्रम आखून दिला होता.
मात्र आता अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. जुन्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने दिवाळीत निवडणुकीचे फटाके फुटतील असा अंदाज घेऊन सर्वच पक्षाने आपापली तयारी सुरू ठेवली होती. भाजपने तर ‘मोदी सरकार ग्यारह साल बेमिसाल’ या माध्यमातून महापालिका निवडणुकीची तयारी चालवली आहे. त्यांनी चारशे सभा व बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
असे सर्व काही असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने निवडणुकीचा मुहूर्त थेट नव्या वर्षात निघेल असाच तर्क लावला जात आहे. परिणामी उर्जा घेऊन कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे पूरता हिरमोड होणार आहे.त्याच प्रमाणे भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिरवत असलेल्याना वाट पाहावी लागणार आहे. “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न”, असं जे म्हटलं जातंय, त्याप्रमाणेच या निवडणूका घेण्यात नाही काही ना काही सतत अडथळे निर्माण होत आहेत.तरीही मात्र निवडणुका केव्हा नक्की होतील या कडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

