अखेर भाकरी फिरवलीच ! NCP च्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.
अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण सुप्रिया सुळे यांच्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांनी घोषणा केली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची काय भूमिका राहणार?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.