खळबळजनक : उच्चभ्रू वस्तीतील स्पा सेंटर मध्ये देहविक्रीचा पर्दाफाश, सहा महिलांची सुटका
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायाचा जिल्हा पेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरचा मालक आणि जागा मालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्पा सेंटरमध्ये मसाज सेवांच्या आडून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या सहा महिलांची सुरक्षित सुटका केली. त्या मध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील २६ वर्षीय महिला, मणिपूरमधील ३१ व ३७ वर्षीय दोन महिला, पूर्व सिक्कीममधील ३० व ३१ वर्षीय दोन महिला तसेच नेपाळमधील बांके जिल्ह्यातील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नेपाळमधील महिलेच्या कागदपत्रांसह पासपोर्ट, व्हिसा आणि भारतातील वास्तव्याबाबतची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.
या प्रकरणात नीरज सिंह पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तो संबंधित स्पा सेंटरचा मालक व परवानाधारक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. स्पाच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसायाचे व्यवस्थापन व सुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर राजेन्द्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हा संबंधित जागेचा मालक असल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीर कृत्यासाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.


