राज्यातील बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची SIT चौकशी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात नुकत्याच गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या नागपूर बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद मंगळवारी अधिवेशनात उमटले. याप्रकरणी सर्वच पक्षाच्या आमदारांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (State School Education Minister Dada Bhuse)यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी व विधी अभ्यासक यांची ‘ एसआयटी’ स्थापन करण्याची घोषणा केली.
त्याच प्रमाणे नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत लक्षवेधी मांडली. त्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब, भंडारा येथील आमदार नरेंद्र भांडेकर, आमदार काशीनाथ दाते, मालेगांवाचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिकयांच्यासह इतर सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
आ. प्रशांत बंब यांनी, या सर्व प्रक्रियेत शिक्षण विभागातील अधिकारी सामील असल्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही. त्यामुळे प्रथमतः शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करा. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, तशी तरतूद नसेल तर ती तरतूद केली पाहिजे. असे म्हटले आहे.
प्रवीण दटके म्हणाले, नागपूर शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळा हा केवळ एका विभागापुरता मर्यादित नाही तर त्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्य शासनाने या सर्व प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. राज्यभरातील सर्व विभागांमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. सुमारे 1200 ते 1500 कर्मचाऱ्यांची भरती यातून झाली असण्याची शक्यता आहे. त्यातच या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षांची तीन वेळा बदली करण्यात आली आहे.त्यामुळे शासन या सर्व प्रक्रियेत आरोपींना पाठीशी घालत आहे का? असा संशय निर्माण होतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेची SIT स्थापन करून चौकशी करावी.
मालेगावचे आमदार खालिक म्हणाले, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नाकाखाली म्हणजेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचाराचे धागेदोरे नाशिक पासून मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. त्याचप्रमाणे सर्व भ्रष्ट संस्था चालकांवर कारवाई करावी. बोगस भरतीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या संबंधित शिक्षकांकडून त्याची वसुली करावी. नाशिक मध्ये तेच तेच अधिकारी वर्षानुवर्षे नाशिक जिल्ह्यात काम करतात? त्यांची बदली होणार का? असा प्रश्न केला.


