पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी
पहलगाम,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ‘मिनी स्विट्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरातील बैसरन येथे मंगळवार रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन विदेशी नागरिक (संयुक्त अरब अमीरात आणि नेपाळमधून) तसेच दोन स्थानिक रहिवासी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, अतुल मोने या सहा जणांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाणार आहे. यापैकी ४ पर्यटकांचे पार्थिव मुंबईत तर २ पार्थिव पुण्यात पाठवले जाणार आहेत. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी मदतही जाहीर केली आहे.
मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये खळबळ माजली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परत येत दिल्ली विमानतळावरच एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली.
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारे सर्व ७ दहशतवादी परदेशी नागरिक होते, यामध्ये पाकिस्तानचा थेट हात असल्याची शक्यता आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले असून, त्यांच्या ओळखी पटवण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी पाकिस्तानातून सतत संदेश प्राप्त करत होते. हल्ला करताना ४ जणांनी थेट पर्यटकांवर गोळीबार केला, तर उर्वरितांनी सुरक्षा यंत्रणांपासून संरक्षणासाठी इतर भागांमध्ये भूमिका घेतली होती.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेंस सध्या भारत दौर्यावर असताना, आणि ट्रेकिंग व पर्यटन हंगाम सुरु असतानाच हा हल्ला झाला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा गोळीबार झाला आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले – “जे लोक या अमानवीय हल्ल्यामागे आहेत, त्यांना न्यायासमोर आणले जाईल. त्यांना क्षमा केली जाणार नाही. त्यांचे नापाक हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत. दहशतवादाविरोधातील आपला संकल्प अधिक बळकट होईल.”
हल्ल्यानंतर केंद्र व राज्य सरकार, तसेच लष्कराने मिळून सुरक्षा यंत्रणा अधिक तीव्र केली असून, विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये शोधमोहीम तेजीत आहे. एनआईए आणि रॉ या केंद्रीय यंत्रणांना हल्ल्यामागील पद्धत, शस्त्रास्त्रांचा स्रोत आणि पाकिस्तानातून मिळालेल्या संदेशांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा