जळगांव येथून तिरुपती,इंदौर, अहमदाबाद विमानसेवा सुरू करा, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन मागणी
मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाश्यांच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ वेळ करावी ही मागणी केली.
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन, जळगांव विमानतळ येथून लवकरात लवकर “तिरुपती, इंदौर व अहमदाबाद” साठी विमानसेवा चालू करणे बाबत मागणी केली. तसेच मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाश्यांच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ वेळ करावी ही मागणी केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मागणी करतांना असे सांगितले की, जळगांव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लँण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असून, जळगांव विमानतळ येथून सध्या स्थितीत मुंबई व पुणे साठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु आहे. परंतु येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुणे साठी संध्याकाळी व मुंबई साठी सकाळी दररोज विमानसेवा चालू करण्यात यावी.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केलेल्या मागणीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांनी सकारात्मक पणे घेऊन लवकरच केलेल्या दोन्ही मागणीवर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.