जिल्ह्यात ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात
‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पारोळा येथील एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना पारोळा शहरा कडून भडगाव कडे एका खाजगी कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.माहिती मिळाल्यानंतर भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ २२ मार्च रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदी करून सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी फोर्ड फिस्टा कार क्रमांक MH 01 BB 2216 अडवून तिची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेल्या मेफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाच्या १४.३५० ग्रॅम वजनाचे सुमारे १० पुड्या (किंमत चाळीस हजार) आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश हरी चौधरी. वय ३५ वर्ष. व त्याची पत्नी (दोघेही रा. पारोळा, ह.मु. भडगाव) याना जागीच ताब्यात घेतले असून दोघांवर एनडीपीएस कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह तस्करीसाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची तांत्रिक खातरजमा करण्यासाठी जळगाव येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणामागे अंमली पदार्थ तस्करीचे एखादे मोठे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.
