चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्री चार बंद घरे फोडली, यावल तालुक्यातील घटना
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज | चोरट्यांनी एकाच रात्री चार बंद घर फोडल्याची घटना यावल तालुक्यातील न्हावी येथे
उघडकीस आली. या घटनेनं परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
न्हावी गावातील दुगदिवी मंदिरासमोरील नेमिदास पाटील हे बाहेरगावी गेल्याने घर बंद आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातील ३ ते ४ ग्रॅमच्या कानातील सोन्याच्या साखळ्या लांबवल्या. चावदस नगर मधील सुरेश पिंपळे यांचेही बंद घर चोरट्यांनी लक्ष केले. सेफ्टी दरवाजा व मेन दरवाजाचे कुलूप टॉमी टाकून तोडले. घरातील सामान अस्तव्यस्त फेकला. मात्र, हाती काहीही लागले नसल्याचे सांगितले गेले .
तसेच चावदस नगर समोरील भोगे मळ्यातील विजय महाजन यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा व आतील सेफ्टी कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सर्व कपाटांचे लॉकर तोडून तपासणी केली. पण, चोरांच्या हातात काहीही लागले नाही.
याच परिसरातील वामन रामा इंगळे यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत शिरले. चांदीच्या दोन अंगठ्या व एक ओम पान घेऊन ते पसार झाले. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले असून न्हावी पोलिस पाटील संजय चौधरी यांनी फैजपूर पोलीस स्टेशन ला या घटने संदर्भात माहिती दिली. उपनिरीक्षक सय्यद, हवालदार सूरदास, भूषण ठाकरे, देवा पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.


