हरिणाच्या मांसाची तस्करी, मांस व शिंगांसह दोघांना अटक
चोपडा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चोपडा तालुक्यात हरिणाचे मांस विक्री साठी आणणाऱ्या दोन तस्करांना चोपडा ग्रामीण पोलीसांनी वन विभागाच्या मदतीने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून हरिणाचे मांस व हरिणाची दोन शिंगे जप्त करण्यात आले असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८ वर्ष. रा. टाक्यापाणी, वरला) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५ वर्ष. दोन्ही राहणार मध्य प्रदेश) हे वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी दुचाकी क्रमांक एमपी १० एनसी ४८५७ वर
येणार असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती देऊन फॉरेस्ट कंपार्टमेंट बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सफौ राजु महाजन, पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ गजानन पाटील, पोकॉ विनोद पवार, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ सुनिल कोळी, तसेच वनविभागाचे विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी.आर. बारेला, वनरक्षक बानू बारेला आणि वनरक्षक योगेश सोनवणे यांच्या पथकाने बुधवार, १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली.
नका बंदी दरम्यान दुचाकीने जात असलेल्या दोघांना अडवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याजवळ हरणाचे दोन शिंगे आणि मांस मिळून आले. ते पोलीसांनी जप्त केले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात, वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८ वर्ष. रा. टाक्यापाणी, वरला) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५ वर्ष. दोन्ही राहणार मध्य प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

