भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

हृदयस्पर्शी : आई-वडिलांची सेवा करण्यासाठी दोन भावांची न्यायालयात धाव ; न्यायालयाच्या निर्णयाने भावूक वातावरण

मंडे टु मंडे न्युज | आजच्या धावपळीच्या जीवनात वृद्ध आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या घटना समोर येत असताना, सातारा न्यायालयात समोर आलेल्या एका हृदयस्पर्शी प्रकरणाने मात्र संस्कार, माणुसकी आणि कर्तव्याची नवी जाणीव करून दिली.


वयाच्या ९० वर्षांपुढे असलेल्या आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी लहान भावाने आपल्या मोठ्या भावाविरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची भूमिका तक्रार किंवा आरोप करण्याची नव्हती; तर आई-वडिलांची सेवा करण्याची मनापासूनची विनंती होती.


लहान भावाने न्यायालयासमोर आपली भूमिका मांडताना सांगितले की, गेली २५ वर्षे मोठ्या भावाने आई-वडिलांची अत्यंत प्रेमाने सेवा केली आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्यामुळे मला माझ्या आई-वडिलांची सेवा करण्याची, माझ्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळवून देण्याची आणि मोठ्या भावालाही आधार देण्याची संधी मिळावी.


न्यायालयाने आई-वडिलांची इच्छा जाणून घेतल्यानंतर लहान भावाच्या बाजूने निर्णय दिला. निर्णय ऐकताच मोठ्या भावाला अश्रू अनावर झाले. आई-वडिलांपासून दूर व्हावे लागणार असल्याची भावना त्याला भावूक करून गेली.


या घटनेतून आई-वडिलांवरील प्रेम, भावांमधील आपुलकी आणि कर्तव्यभावनेचे अनोखे दर्शन घडले. वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्यासाठी दोन भाऊ न्यायालयाच्या दारात पोहोचणे हीच आजच्या समाजासाठी एक प्रेरणादायी घटना ठरली आहे.
आई-वडिलांचा सन्मान, त्यांची सेवा आणि त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आधार देणे, हीच खरी जीवनाची श्रीमंती आहे, असा संदेश या हृदयस्पर्शी प्रकरणातून मिळतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!