जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील ३४ दुचाकींसह वरणगाव व भुसावळ येथुन दोघांना अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ व वरणगाव शहरातून अटक केली असून त्यांच्या कडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील या दुचाक्या असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ सीए ५१८७ ही दुचाकी १९ जून रोजी दुपारी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या बाबत बोदवड पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नुसार या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. असता बोदवड पोलिसांनी जितेंद्र सोनवणे याला अटक केली. त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता, त्याने ही चोरी त्याचा सहकारी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव ता. भुसावळ यांच्यासोबत केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रुपेश चौधरी याला वरणगाव शहरातून अटक केली.
दरम्यान चोरींच्या गुन्ह्यां संदर्भात दोघांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या भागात जाऊन दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. त्या नुसार पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश जाधव, गुन्हे शोध पथकातील पोउनि सुधाकर शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, पोलीस नाईक शशिकांत महाले, भूषण सोनवणे यांनी केली आहे.