दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूस जप्त, अवैध शस्त्र वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | धुळ्याच्या दोन तरुणांकडून २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस चोपडा ग्रामीण पोलिसांनी बोरअजंटी गावालगात वनविभागाच्या नाक्यावर सापळा रचून जप्त केले. त्यांच्या कडून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोपडा-वैजापूर रस्त्यावर धुळे येथील दोन तरुण गावठी कट्टे घेऊन मोटरसायकलने प्रवास करीत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश टाक यांना
मिळाली. त्यानुसार बोरअजंटी गावालगात वनविभागाच्या नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईवेळी दोघांकडून ५० हजार रुपयांचे २ गावठी कट्टे, ११ हजार रुपये किमतीचे ११ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जयेश सुरेश धापटे (वय २२, रा. सहजीवन नगर, धुळे) आणि फतेसिंग मिलनसिंग भादा (वय २०, रा. मोहाडी ता. धुळे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

