दुचाकीची डिव्हायडरला जोरदार धडक, रावेर तालुक्यातील जुळ्या भावांपैकी एक ठार एक जखमी, नशिराबाद उड्डाणपूलावरील घटना
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव तालुक्यातील नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या भीषण अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दोघे भाऊ रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम करीत होते.
चैतन्य सुपडू फेगडे (वय २६ रा.निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा गावात राहणारा चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला असून घरकुल योजने संदर्भातची फाईलच्या कामानिमित्ताने चैतन्य हा भाऊ चेतन आणि वडील यांच्यासोबत सोमवारी ३१ मार्च रोजी जळगावला निघाले. दरम्यान चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एमएच १९ इइ १७०२) ने भुसावळकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले.
त्यावेळी जळगावपासून जवळ असलेल्या नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडरला जोरदार धडकली. या भीषण अपघातात चैतन्य याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघात घडल्यावर नशिराबाद पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी झालेल्या चेतनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागलेला होता. निंभोरा येथील चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण पुणे (खडकी)रेल्वे स्टेशनला ट्रॅकमन या पदावर कार्यरत होता. या घटनेमुळे रावेर तालुक्यातील निंभोरा गावावर शोककळा पसरली आहे. तर खाजगी रुग्णालयात चेतनवर उपचार सुरू आहेत.