यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू
धरणाच्या नदी पात्रात घडलेला प्रकार
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रक्षाबंधनाच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली. यावल तालुक्यातील परिसरात प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण येथे मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणाच्या नदी पात्रात पाय घसरून तो खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
यावल तालुक्यातील निमगाव येथील रहिवाशी असलेल्या आई-वडील, बहिण यांच्यासह राहत असलेल्या वेदांत सुवर्णसिंग पाटील .वय २०, रा. निमगाव ता. यावल हा तरुण आज सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत निंबादेवी धरण येथे पोहोचण्या साठी गेला होता. त्या ठिकाणी नदी पात्रात अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत नदी पत्रातील पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.
दरम्यान, यावेळी वेदांत पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. यावल पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निमगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे.