राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, IMD कडून अलर्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पुढील काही दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, पूर्वेकडील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशात आज पावसाचा अंदाज आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, उपनगर, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात ७० ते ९० किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहून मुसळधार पावसाने झोडपून काढलं. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली.
या आठवड्यात राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे. तर पुढचे तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होताना दिसेल.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. हजारो हेक्टर वरील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत. गारपिटमुळे केळीला मोठा फटका बसला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पुढील पाच दिवसांपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम राहील. ७ आणि ८ मे रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस किमान तापमानात किंचितशी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण किंवा पावसाच्या हलक्या सरी बरसतील. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशात आज पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका कायम आहे. तसेच, उत्तर पश्चिम मध्य प्रदेशात हवेच्या वरच्या भागात चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे. दक्षिण पश्चिम राजस्थान ते उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत आणि दक्षिण तेलंगणापासून वरच्या बाजूला कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पावसासाठी ते पोषक वातावरण असून ९ मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा