भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

महिला दिनाच्या शुभेच्छा देत रोहिणी खडसेंची राष्ट्रपती कडे मोठी मागणी : खून करण्याची परवानगी द्या !

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके l सध्या राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज महिला दिनी च राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रपती महोदय यांचे कडे एक विचित्र मागणी केली आहे. त्यांनी चक्क खून करण्याची परवानगी राष्ट्रपती यांचे कडे मागितली आहे.

आज महिला दिन, महिला दिनानिमित्त महिलांवर, तरूणींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पण याच महिला, मुली, तरूणी राज्यात सुरक्षितपणे, निर्भयपणे फिरू शकतात की नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत एका १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. राज्यात रोजच कुठे ना कुठे अशा घटना उघडकीस येतच आहेत. दरम्यान आज जागतिक महिला दिन ! नारीचे, स्त्रीचे कौतुक करणारा हा दिवस. मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई एक विचित्र मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या. अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

काय म्हटलंय त्यांनी नेमकं त्या पत्रात… जाणून घेऊया..

मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत

विषय :- एक खुन माफ करणेबाबत

महोदया,

सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…

आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?

नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.

आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू

धन्यवाद!

सौ रोहिणी खड़से खेवलकर

प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!