रावेर-यावल तालुक्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरणाच्या कामाला सुरवात
रावेर/यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र शासनाच्या ‘जलव्यवस्थापन कृषी पंधरवाडा २०२५’ उपक्रमांतर्गत रावेर व यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण या महत्वाकांक्षी कामाला सुरवात झाली आहे. न्हावी-बोरखेडा पाणलोट क्षेत्रातील सातपुड्याच्या पायथ्याशी पाझर तलावाच्या गाळ उपसण्याच्या कामाने सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी आमदार अमोल जावळे यांच्या विशेष प्रयत्नांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
१९९९ मध्ये केंद्रीय भूजल यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या “Artificial Recharge to Banana Growing Area” अहवालानुसार, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यात भूजल पातळी दरवर्षी १ मीटरने घटत असल्याचे स्पष्ट झाले होते. सद्यस्थितीत रावेर-यावल तालुके केंद्रीय भूजल मंडळाकडून ‘अतिशोषित क्षेत्र’ (Over Exploited Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरणाची नैसर्गिक क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी पाझर तलाव, नाले व बंधाऱ्यांचे गाळ उपसून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून, यावल-रावेर तालुक्यातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यास हातभार लागणार आहे.
या पद्धतीचे काम थेंब अमृताच्या माध्यमातून माजी खासदार तथा आमदार कृशिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून याआधीही रावेर-यावल मतदारसंघातील नद्यांमध्ये राबविण्यात आले होते.
या उपक्रमासाठी मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा संधारण अधिकारी (जि. प.) जळगाव आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने यावल व रावेर तालुक्यात सुमारे ५० जलसंधारण कामे गाळमुक्त केली जाणार आहेत. यामधून सुमारे दोन लाख घनमीटर गाळ काढला जाणार असून त्यामुळे जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, पावसाळ्याच्या काळात कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भात जिरणार असून, भूजल पातळी स्थिर व सुदृढ होण्यास मदत होणार आहे. भविष्यात याचा थेट फायदा यावल-रावेर तालुक्यातील केळीपट्ट्याला होणार असून, भूजल पातळी वाढल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई कमी होईल, केळी उत्पादनात वाढ होईल तसेच वीज वापरात बचत होऊन लोडशेडिंग कमी होण्यासही मदत होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार व जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार हे काम राबविले जात आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे सहकार्य लाभत आहे.
या कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एस. ढंगारे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी श्री काकडे व सेवानिवृत्त उपअभियंता श्री के. पी. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जलसंधारण अधिकारी विसपुते, पी. के. माळोदे, स्थानिक सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा