यावल शहरात कोरोनाला न घाबरणारी नागरिकांची गर्दी आणि शासकीय यंत्रणा सुस्त !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। यावल शहरात एसटी बस स्टँड परिसरात आणि बुरुज चौकात, मेन रोड वरील बारीवाड्याचे चौकात बोरावल गेट परिसरात,सुदर्शन चित्र मंदिर परिसरात कोरोनाला न घाबरणारी तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाची पायमल्ली करणारे, नाक तोंडावर माक्स न लावणारे,सोशल डिस्टन्स न पाळणारे नागरिकांची गर्दी दिवसभर दिसून येत आहे या सर्व प्रकाराकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरासह तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण दिसून येत आहे.
यावल एसटी स्टँड परिसरात, यावल पंचायत समिती जवळ,कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ,बियर बार चौकात तथा बारी वाड्यात,देशी दारूच्या दुकानात जवळ मेन रोडवर रिकामटेकड्या लोकांची नागरिकांची, मद्यप्राशन करणाऱ्यांची तसेच वरील दिलेल्या इतर सर्व ठिकाणी चहा पाणी नाष्टा इत्यादीची अनेक अतिक्रमित दुकाने असल्याने हात मजुरी करणाऱ्याची मोठी गर्दी व आरडाओरड सुरू असते. यावल शहरातील स्त्री-पुरुषांना आपल्या फॅमिली डॉक्टर कडे औषध उपचारासाठी तसेच मेडिकल्स दुकानात औषधी खरेदी करण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना रिकामटेकड्या लोकांच्या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे यातील 90 टक्के लोक आपल्या तोंडावर मुखपट्टी न लावता,सोशल डिस्टन न पाळता गर्दी करीत असतात या रोजच्या दैनंदिन गर्दीकडे यावल नगर परिषद,यावल पोलीस,यावल महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यावल शहरासह संपूर्ण तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय यंत्रणेने कठोर निर्णय घेऊन दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.