हिंदूसंघटन मेळावा ; हिंदु राष्ट्रासाठी काळ पोषक असल्याने प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक — प्रशांत जुवेकर
फैजपूर,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सेक्युलर, जिहादी, साम्यवादी, कथित पुरोगामी अशा सर्व देशविरोधी शक्तींनी गेली अनेक वर्षे हिंदूंचा अतोनात छळ केला आहे. भारताचे अक्षरशः लचके तोडण्याचा प्रयत्न केला आहे; पण येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ते फैजपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभ दिव्य मंगल कार्यालयात १६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदूसंघटन मेळावा’ प्रसंगी बोलत होते. मेळाव्याला सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनीदेखील संबोधित केले.
ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या महराष्ट्रातील गड दुर्ग यांची वर्तमान स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक गड दुर्गांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे आणि प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. आपल्या पूर्वजांचा हा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आता आपल्याला जोमाने प्रयत्न करावे लागतील.
भूमाफिया वक्फ कायद्याच्या विरोधात १८ ऑक्टोबरला फैजपूर प्रांत याना निवेदन देणार !
भूमी बळकवणे, खडणी वसूल करणे’, धर्मांतरण करणे आदी षड्यंत्र राबवणाऱ्या वक्फ बोर्डच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी जळगाव येथे याविरोधात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबरला भव्य आंदोलन उभारणार असून फैजपूर येथे १८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केली. त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले.
हिंदुं बहुल देशात हिंदू स्त्रियांचे दर पत्रक तयार करून आज लक्षावधी हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यात आले आहे. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे. नकार देणाऱ्या युवतीच्या तर थेट हत्याच केल्या जात आहेत. या स्थितीत हिंदु महिलांनी या आघात विषयी जाणून घ्यायला हवे. हिंदु धर्माचे आचरण केल्यास त्यांच्यात आत्मबल निर्माण होऊन त्या या आघतांचा सक्षमपणे सामना करू शकतील. यासाठी आपण आपल्या घरातून धर्माचरणाच्या कृती केल्या पाहिजेत. जसे आपण घरातून निघताना कुंकू लावावे, जवळच्या मंदिरात जाऊन दिवसातून एकदा देवाचे मनोभावे दर्शन घ्यावे, एकमेकांना भेटल्यावर विदेशी पद्धतीने हस्तांदोलन न करता नमस्कार करावा अशा लहान कृती करत गेल्यास त्याचा नक्की लाभ होइल.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापक स्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. यावेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्व विषद करणारी अशा व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आल्या. मेळाव्याचे सुत्रसंचालन श्री. निखिल कदम यांनी केले.