यावल येथे शेत विहिरीतून विद्युत पंप चोरट्यांनी नेले चोरून !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील कालव्या लगत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेत विहिरीतून सुमारे ८० हजारा रूपये किंमतीचे विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी,शहरातील जुना भालशिव रोडवर शेत असलेले सतीष सुपडू यावलकर व गोपाळ कोळी या दोघ शेतकऱ्यांच्या शेत विहिरीवर पाण्याचा उपसा करण्यासाठी यावलकर यांच्या विहिरीत दहा तर कोळी यांच्या विहिरीत साडेसात अश्वशक्तीचे पंप किंमत सुमारे ८० हजार हे बसविण्यात आले होते. मंगळवारी शेतकरी शेतात गेले असता दोघ विहिरीतील विद्युत पंप अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शेत विहिरीतून विद्युत पंप चोरीस गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस ठाणे हद्दीत शेतात विहिरीवरील केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असताना एकाच रात्रीत दोन ठिकाणी वीजपंप चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी यावल पोलिसात सतीष यावलकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरूध्द विद्युत पंप सह केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे.