अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत रोकड केली लंपास !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील विरार नगरात अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे बंद घर फोडत पंधरा हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विरार नगर येथे पुष्पा विजय अहिरराव (वय-५८) आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. कामाच्या निमित्ताने त्या घराला कूलूप लावून ९ फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त केले आणि १५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. शनीवार १९ फेब्रुवारी सेवानिवृत्त मुख्याध्यापीक अहिरराव ह्या घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.