यावल जगतगुरू वेदव्यासांची राज्यातील एकमेव तपोभूमी, कोरोनाविषाणू मुळे भाविक दर्शनापासून वंचित.
यावल(सुरेश पाटील)।
भारतात काशीनंतर महत्त्वाचे असे व्यासभूमी म्हणून ओळखले जाणारे व भाविकांचे नागरिकांचे श्रद्धास्थान यावल हे महर्षी व्यासांच्या तपोभूमीचे महाराष्ट्रातील एकमेव पवित्र क्षेत्र आहे, व त्यामुळेच या स्थानाला महात्म्य प्राप्त झाले आहे, अशा महर्षी व्यास पूजनाचा अर्थात गुरुपौर्णिमेचा आजचा हा पवित्र दिवस यानिमित्ताने तसेच कोरोनाविषाणू या जीवघेण्या महामारी परिस्थितीचा विचार लक्षात घेता तसेच शासनाचे आदेशाचे पालन करून श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान यावल यांनी नागरिकांना श्री व्यास महाराजांचे दर्शन घेता येणार नसल्याचे तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर करुन फक्त एका व्यक्तीच्या हस्ते ( ते सुद्धा पत्नी सह नव्हे ) यावल शहरातील ब्राह्मणवृंदाच्या उपस्थित श्री व्यास महाराजांची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली या वेळी सोशल डिस्टन्स कायम ठेवून तसेच शासनाचे सर्व आदेश पाळण्यात आल्यामुळे गेल्या कित्येक वर्षाचा आढावा लक्षात घेतला असता प्रथमच आज व्यास मंदिरात स्री- पुरुष भाविक नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. आज गुरुपौर्णिमा व्यास पूजनाचा पवित्र दिवस सर्व ज्ञानाचा उगम व्यासमुनी पासून होतो अशी भारतीय जन माणसाची धारणा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात, महर्षी वेदव्यास यांच्या रूपात आपल्या जीवनात येणारे जे जे गुरु त्यांच्याविषयी पूज्यभाव व कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी व्यासांची पूजा ठरणार आहे, वेदोनारायण व्यासांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज आपण त्यांचे स्मरण करूया भारतीय संस्कृतीचा ध्वज आपल्या कार्याने सर्वत्र फडकवणारे महर्षी व्यास म्हणजे ज्ञानभास्करच म्हटले जातात, भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि त्या संस्कृतीची रचना व्यासांनीच केली, वेदाचे संकलन करण्याचे आणि त्यांची वर्गवारी करण्याचे अवघड कार्य व्यासांनीच केले. संकलन केलेल्या वैदिक पाठांतराच्या सुलभपणासाठी त्यांनी चार भागात वर्गीकरण केले त्यातूनच चार वेद अस्तित्वात आले, व्यासांनी महाभारतात सारखा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला, महाभारताबद्दल भारत पंच वेद असे म्हटले जाते महाभारतात धर्मशास्त्र आले आहे, नीतिशास्त्र गुंफले आहे, राज्यशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही दर्शन घडते महाभारताच्या कथेशी व्यासांचा फार मोठा जवळचा संबंध होता आणि आहे. श्री व्यासांनी महाभारत हा ग्रंथ लिहून आणि त्यात भगवद्गीता शब्दांकित करून व्यासांनी हा जगावर फार मोठा उपकार केला आहे त्यांनी श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला.
गुरुपौर्णिमा म्हणजे काय ? शिक्षक आपल्याला ज्ञान प्रदान करतात.परंतु गुरू आपल्याला ज्ञानाच्या जाणीवेकडे घेऊन जातात व त्याच बरोबर आपल्या अस्तित्वाचे भान पण करून देतात देतात. आचार्य ( शिक्षक ) माहिती पुरवितात, तर गुरु जागरूकता आणि आत्मज्ञानाची शिकवण देतात. मनाचा कारक चंद्र आहे. पोर्णिमा म्हणजे पूर्णत्व होय, गुरु पौर्णिमेस शिष्य संपूर्णत: कृतज्ञतेतच असतो, शिष्य कृतज्ञतेच्या समुद्रात ओतप्रोत डूबत असतो. हा दिवस त्याच्यासाठी कृतज्ञतेचा व उत्सवाचा असतो. कोरोनाविषाणू च्या महामारी मुळे यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरात आज व्यास पौर्णिमेनिमित्त व्यास महाराजांचे दर्शन घेण्यासाठी व पूजा करण्यासाठी कोणालाही प्रवेश मिळाला नाही. श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान कडून जिल्हाधिकारी जळगाव व शासनांच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करून यावल शहरातील सतीश मल्हाराव गडे यांच्या शुभ हस्ते आणि शहरातील ब्राह्मण वृंदाच्या उपस्थितीत श्री व्यास महाराजांची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली, प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुंवर, यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांचे आदेशानुसार श्री व्यास मंदिरात भाविक नागरिक यांनी गर्दी केली आहे किंवा नाही? श्री व्यास पौर्णिमा / गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करणेकामी यावल नगर परिषद स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे हे व्यास मंदिरात उपस्थित होते.