यावल नगरपालिकेच्या अतिरिक्त साठवण तलाव बांधकामास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी !
यावल (सुरेश पाटील )। यावल नगरपालिकेच्या हद्दीतील शहराला पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलावाच्या कामास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2020 बुधवार रोजी प्रशासकीय मंजुरी दिल्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारी पाणीटंचाई दूर होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल शहराला हतनुर धरणावरून पाटचारी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाटचारीतून पाणी यावल नगरपरिषदेने सन 1994 साली बांधण्यात आलेल्या 300 एम.एल.डी. क्षमतेच्या साठवण तलावात साठवणूक करून त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी जलकुंभ द्वारे शहराला पुरविण्यात येत आहे. मात्र सदर तलाव पंचवीस वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात गळती होऊन साठा तीन महिन्याने ऐवजी पन्नास दिवस पुरेल एवढा साठवण होत होता.ही अडचण आणि समयसूचकता लक्षात घेऊन नगरपरिषदेने 22 फेब्रुवारी 2017 व 13 मार्च 2017 च्या सर्वसाधारण सभेत नवीन साठवण तलाव बांधण्याच्या विषयास मंजुरी घेतली होती. मात्र तिन-साडेतीन वर्ष होऊन देखील सदर तलावाचे काम रखडले होते नंतरच्या काळात राकेश कोलते प्रभारी नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपरिषदेचे गटनेते माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सदर कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांचेकडून तांत्रिक मंजुरी मिळवून दिनांक25/6/2020 रोजी प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. सदर कामास माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी 14 वित्त आयोग योजनेतून मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.