कार्यकारी अभियंत्याकडून मंत्रालयाचा धाक दाखवून ठेकेदारांची आर्थिक लुट; कंत्राटदार संघटनेची तक्रार
जळगाव (प्रतिनिधी)। लहान ठेकेदारांना काम मिळू नये म्हणून शासनाच्या धोरणाविरुद्ध कामे एकत्रित करून काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना मदत करण्यासाठी व आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी अलीकडेच संदर्भीय सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. लहान कंत्राटदारांना कामे मिळू नयेत, या हेतूनेच कार्यकारी अभियंता विजय पाटील जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवित आहेत.
एवढेच नव्हे तर, मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा धाक दाखवून बिलं काढण्यासाठी कार्यकारी अभियंता हे ठेकेदारांची सातत्याने आर्थिक लुट करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने प्रधानमंत्री ग्रामसेवक योजना एमआरडीए, नाशिक प्रादेशिक विभाग येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली असल्याने कंत्राटी संघटनेच्या या आरोपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मुरलीधर पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव येथे कार्यरत असलेले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील हे त्यांच्या मनमानी कारभार करणे शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयात गैरहजर राहणे. पैशांची मागणी करणे, यासाठी सुप्रसिद्ध आहेत. कार्यकारी अभियंता यांचे हजेरीपट तपासले तर ते महिन्यातून दोन-तीन दिवस हजर आसतात. तसेच सर्व कारभार नाशिक येथून चालवतात. त्यांच्या कार्यशैली बाबत जळगावमधील वृत्तपत्रात छापून आलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध बऱ्याच वेळा तक्रारी झाल्या आहेत. देयकं अदा करण्यासाठी हेतुपुरस्कर त्यांना नोटीस देऊन कोंडी करणे, ठेकेदारांकडून पैसे मागणे, त्रास देणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. बरीच ठेकेदार मंडळीआर्थिक कोंडीमुळे व भीतीपोटी विजय पाटील यांच्याविरुद्ध बोलायला असमर्थता दाखवतात,
कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे केंद्र व राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. केंद्र आणि राज्य सरकाराची संयुक्त योजना असतानाही या विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे तक्रारी अर्जातून समोर आले आहे. बिलं काढण्यासाठी अधिकारी पैसे मागतात ही गंभीर तक्रार आहे. या तक्रारीत तथ्य असल्यास जिल्ह्यातील विकास कामे कोणत्या दर्जाची झाली असतील, यांचा अंदाज येतो. तसेच बिलं काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालय तसेच मंत्रालयाचे नाव सांगणे म्हणजे या विभागाचे आर्थिक चक्र ‘गल्ली ते दिल्ली’ असल्याचेही अधोरेखित होत आहे. सर्व या त्रस्त कंत्राटदारांच्या तक्रारींमुळे महासंघ त्या सर्वांच्या वतीने तक्रार नोंदवित आहेत. शासनाच्या धोरणाविरुद्ध कामे एकत्रित करून काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना मदत करण्यासाठी व आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी त्यांनी अलीकडेच संदर्भीय निविदांबाबत महासंघाने लेखी तक्रार वरिष्ठ कार्यालयात केली आहे. या तक्रारीवर अभियंता विजय पाटील यांनी दिलेले उत्तर आम्हाला मान्य नाही. दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. कार्यालयात उपस्थित न राहणे, उर्मटपणे वागणे, कार्यक्षेत्रावर कधीच न जाणे, ठेकेदारांकडून बिले अदायगीसाठी वरिष्ठ कार्यालय तथा मंत्रालय स्तराचे नावे सांगून पैशांची मागणी करणे, असे गंभीर प्रकार हे अभियंता विजय पाटील करीत आहेत., त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी कंत्राटदार महासंघामार्फत करण्यात आली आहे.