भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

प्रशासनातील धुरंधर, समाजाभिमुख व अध्यात्मप्रवण व्यक्तिमत्त्व, समाजभूषण तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त आ.श्री. देवराम नामदेव चौधरी काळाच्या पडद्याआड !

सावदा(प्रतिनिधी)। प्रशासनातील धुरंधर, समाजाभिमुख व अध्यात्मप्रवण व्यक्तिमत्त्व, समाजभूषण तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त आदरणीय श्री. देवराम नामदेव चौधरी यांना वृद्धापकाळाने काल दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी देवाज्ञा झाली. श्री. देवरामजींचा जन्म २६ एप्रिल १९३० रोजी यावल तालुक्यातील भालोद येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बी.ए. इंग्लिश तसेच एल.एल.बी. हे कायद्याचे शिक्षण संपादन केले. दरम्यानच्या शैक्षणिक काळात त्यांनी ईलेक्ट्रीक ग्रीड डिपार्टमेंट मध्ये क्लार्क, हेड क्लार्क अशा पदांवर नडीयाद तसेच सुरत येथे काम केले होते.

पुढे त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या बार कौन्सिलची वकिलीची परीक्षा उत्तीर्ण करून वकिलीची सनद प्राप्त केली. पुढे जळगाव येथील जिल्हा सत्र न्यायालय तसेच सिव्हिल जज्ज व मॅजिस्ट्रेट न्यायालयात त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. याकाळात त्यांनी जळगाव म्युनिसिपल कौन्सिलमध्ये सुद्धा १० वर्ष विधी सल्लागार म्हणून कार्य केले आहे. त्यासोबतच अनेकवेळा विशेष सरकारी वकील म्हणून देखील त्यांनी कार्य केले होते. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून ते अकोला येथे असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून कार्यरत झाले. पुढे त्यांनी याच पदावर पुणे तसेच मुंबई येथे कार्य केले. मुंबई येथे कार्यरत असताना त्यांची डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पदोन्नती होऊन मुंबई येथेच नियुक्ती झाली. याकाळात त्यांनी पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे त्यांची मंत्रालयातील विधी व न्याय विभागात सुरुवातीला असिस्टंट ड्राफ्टस्मन-कम-अंडर सेक्रेटरी तर काही महिन्यांनी डेप्युटी ड्राफ्टस्मन-कम-डेप्युटी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली. या काळात त्यांची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लंडन येथे गव्हर्मेंट लीगल ऑफिसर्स फ्रॉम ओव्हरसीज हा टेक्निकल असिस्टंट प्रोग्रॅम साठी निवड झाली होती. सदर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे त्यांना डायरेक्टर ऑफ स्टडीज, लंडन, यु. के. तसेच मिनिस्टर ओव्हरसीज डिपार्टमेंट लंडन यांच्याकडून प्रमाणपत्र लाभले होते. त्यानंतर त्यांची मंत्रालयात ड्राफ्टस्मन कम जॉईंट सेक्रेटरी म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती झाली. या पदावर काहीकाळ कार्य केल्यानंतर त्यांची याच विभागात सेक्रेटरी म्हणून पदोन्नती झाली. पुढे साधारणतः तीन वर्षांनी त्यांची विधी व न्याय विभागात प्रधान सचिव म्हणून पदोन्नती झाली. पुढे काही वर्षांनी याच पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

अशा प्रकारे श्री.देवरामजींची कारकीर्द डोळे दिपवणारी ठरली. या दैदिप्यमान कारकिर्दीची शासन दरबारी दखल घेण्यात आली आणि त्यांची सेवा निवृत्तीनंतरही विधी व न्याय विभागात प्रधान सचिव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांनी पार्लमेंटरी अफेअर्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा प्रधान सचिव म्हणून कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राज्य निवडणूक आयुक्त या संविधानिक पदावर त्यांची पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली पुढे शासनाने त्यांची जमीन विषयक कायदे सुधार समिती च्या चेअरमन पदी नियुक्ती केली. या पदावर त्यांनी अडीच वर्ष कार्य केले. तसेच लिगल कन्सल्टंट म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. लिगल कन्सल्टंट म्हणून ते डायरेक्टरेट ऑफ महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस कालिना, सांताक्रूझ येथे तसेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हल्पमेंट कंपनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई येथे कार्य केले. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट लॉ कमिशनचे चेअरमन तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ( यशदा), पुणे या संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणूनही कार्य केले. श्री. देवराम चौधरी यांची विधी व न्याय विभागात रुजू झाल्यापासून अनेक कायद्यांचे प्रारूप करण्यास सहाय्य केले. तसेच त्यांनी स्वतः अनेक कायद्यांची प्रारूपे तयार केलीत. कायद्याची प्रारूपे टंकलेखकास तोंडी सांगून बनविण्याची त्यांची हातोटी अथवा कला ही विशेष वाखाणण्यासारखी आहे. त्यांनी प्रशासनात प्रदीर्घ काळ दिलेली आदर्श सेवा कौतुकास्पद आहे. ही सेवा बजावत असताना त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले. ज्यामुळे जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडून आली. त्यांना कै. वसंतराव नाईक, कै. वसंतदादा पाटील, कै. सुधाकरराव नाईक, मा. शरदरावजी पवार, बॅ. ए. आर. अंतुले, कै. बॅ. शिवाजीराव भोसले, मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर, कै. शंकरराव चव्हाण, मा. सुशीलकुमारजी शिंदे. कै. विलासरावजी देशमुख अशा कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या समवेत काम करण्याची संधी प्राप्त झाली होती. प्रशासनातील चोखपणा त्यांच्या एकूणच वागण्यात स्पष्टपणे जाणवायचा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!