ब्रेकिंग: खिरोदा येथील मुख्याध्यापिकेसह लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
सावदा, ता . रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपिकला ३६ हजाराची लाच घेताना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले. ही कारवाई आज सोमवार रोजी सकाळी धुळे येथील एसीबीच्या पाथकाने केली असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (५७ वर्ष, रा.चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७ वर्षे, रा.उदळी, ता.रावेर) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे.
या कारवाईने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
यात ६१ वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी २ जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे ३६ हजार रुपये मागण्यात आले. ७ रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणीत लाचेची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी ३६ हजार रुपये मागण्यात आली व कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली.
हा सापळा धुळे एसबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पो. नि . रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. हवा. मुकेश अहिरे, पो. हवा. पावरा, पो. कॉ. रामदास बारेला, चा. पो. हवा. मोरे, चा. पो. कॉ. बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यशस्वी केली. दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

