“कॅफे कट्टा” वर अश्लील चाळे करताना ७ तरुण – तरुणींवर कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैधपणे सुरू असलेल्या ‘कॅफे कट्टा’ वर धाड टाकून अश्लील कृत्य करीत असलेल्या ७ तरुण व तरुणींना रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. पोलिसांनी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रामानंद नगर पोलिसाना माहिती मिळाली होती की, रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एम. जे. कॉलेज परिसरात विठ्ठल मंदिर चौकात एका गळ्या मध्ये असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’ वर अंधाऱ्या जागेत शाळकरी आणि कॉलेजमधील मुला-मुलींना गैरकृत्ये करण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला शहरातील कॅफेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ कॅफेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, कॅफेमध्ये ३x३ फूट लांबी-रुंदीचे प्लायवूडचे छोटे-छोटे कप्पे आणि त्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावलेले आढळून आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे ठेवलेले होते. छाप्यात एकूण सात जोडपी गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज दिली.
पोलिसांनी कॅफेची तपासणी केली असता, तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी प्रकारचे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी, अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद ता. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सचिन रणशेवरे यांच्यासह पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि स्वाती पाटील आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहवा जितेंद्र राठोड करत आहेत.

