भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यचोपडाजळगाव

चोपड्यात भेसळयुक्त दूध : तापवल्यानंतर दूध झाले रबरासारखे

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात तापवल्यानंतर दूधाच्या गुणधर्मात अनपेक्षित बदल झाल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील माजी सैनिक धनराज बाविस्कर यांनी शहरातील एका खासगी दूध डेअरीमधून दूध खरेदी केले होते. घरी नेऊन दूध तापविल्यानंतर ते नेहमीप्रमाणे न राहता चिकट, ताणले जाणारे आणि रबरासारखे दिसू लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकाराचा त्यांनी व्हिडिओ तयार केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नागरिकांकडून दूधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दूधामध्ये भेसळ अथवा इतर काही कारणामुळे हा बदल झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी याबाबत अद्याप अधिकृत प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध झालेला नाही.


धनराज बाविस्कर यांनी या प्रकरणाची दूरध्वनीद्वारे अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगितले आहे. संबंधित दूधाचे नमुने तातडीने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत तसेच दूधाच्या गुणधर्मात झालेल्या बदलामागील नेमके कारण शोधून आवश्यक ती कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.


प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
राज्यभर दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम सुरू असताना चोपड्यातील या घटनेकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. संबंधित दूधाच्या नमुन्यांचा वैज्ञानिक अहवाल आल्यानंतरच दूधामध्ये भेसळ होती की इतर कोणत्या कारणामुळे त्याच्या गुणधर्मात बदल झाला, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!