Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरातील अवैध धंदे आणि वाहतुकीतून हप्ते वसुलीचा आरोप; आ. एकनाथ खडसे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र!

अवैध वसुली करणाऱ्या ७ पोलीस कर्मचाऱ्यांसह पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके ||
मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंदे आणि अवैध वाहतुकीच्या माध्यमातून कथित हप्तेवसुली होत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन संबंधित पोलीस कर्मचारी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार खडसे यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून कथितरीत्या बेकायदेशीर हप्तेवसुली केली जात असल्याचा आरोप आहे. एका विशिष्ट ठिकाणी सहा ते सात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.
या प्रकरणात आमदारांनी पत्रामध्ये सात पोलीस कर्मचाऱ्यांची नावे नमूद केली असून, त्यांच्याकडून दबावाच्या माध्यमातून वसुली केली जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची बाजू किंवा या प्रकरणातील अधिकृत चौकशीचा निष्कर्ष उपलब्ध नाही.

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अवैध धंदे आणि वाहतुकीच्या माध्यमातून कथित वसुली होत असल्यास त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो, तसेच पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, असे आमदार खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सखोल चौकशी करून कारवाईची मागणी
या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग, तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासून सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आपल्याला कळवावा, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
आता या पत्राची पोलीस प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, संबंधित आरोपांची चौकशी होते का आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे मुक्ताईनगरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!