आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा : अघोरी पूजा विधीं ; दाम्पत्याची ४० लाखांची फसवणूक
नाशिक . मंडे टु मंडे न्यूज || दैवी शक्ती, अघोरी पूजाविधी आणि पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप भोंदूबाबा अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात समोर आले आहेत. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पनवेल येथील एका महिलेकडून साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप असतानाच, मंचर येथील एका दाम्पत्याची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारही पुढे आली आहे.
या प्रकरणातील आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कथित फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आजार बरा करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेला नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणाऱ्या अरुण पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित महिलेचा आणि तिच्या पतीचा विश्वास संपादन करण्यासाठी कथित पूजाविधी करण्यात आला. .
दाम्पत्याला पनवेलहून नाशिकला आणताना त्यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आर्थिक परिस्थिती बदलून टाकण्याचे आणि पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवण्यात आले .
कथित अघोरी विधींसाठी साडेसात लाख रुपये
तक्रारीनुसार, संबंधित महिलेला मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गंगापूर रस्त्यावरील बालाजी मंदिराजवळ कथित अघोरी पूजाविधी करण्यात आला. या वेळी महिलेला पांढरे, पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.
या विधीमध्ये मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिलेने आणलेल्या पाच लाख रुपयांवरही पूजाविधी करण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या विधीसाठी बोकडाचा बळी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.
विधी पूर्ण झाल्यानंतर घरी गेल्यावर पैशांचा पाऊस पडेल, असे सांगून दाम्पत्याला पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून पनवेल येथे सोडण्यात आल्याचा आरोप आहे. अशा तीन कथित पूजाविधींसाठी मिळून साडेसात लाख रुपये घेतल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पैसे परत मागितल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत
अपेक्षेप्रमाणे पैशांचा पाऊस न पडल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने संबंधित व्यक्तीकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने तिने मदतीसाठी धाव घेतली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
मंचरच्या दाम्पत्याची ४० लाखांची फसवणूक?
नाशिकमधील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच मंचर येथील एका दाम्पत्याची ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ही रक्कम घेतल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.
या प्रकरणात अरुण पाटील याने काही रक्कम परत केल्याची माहिती असून, उर्वरित रक्कम देण्यास तो टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि फसवणुकीची नेमकी व्याप्ती याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय; एसआयटी चौकशीची मागणी
दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि अघोरी पूजाविधींच्या माध्यमातून आर्थिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवण्यात आल्याचे आल्याने अशा प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.प्रकरणातील कथित फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
तक्रार करण्याचे आवाहन
अरुण पाटील याच्याकडून दैवी शक्ती, अघोरी विधी किंवा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा अनुभव असलेल्या नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे आणि डॉ. मंगेश कादे यांनी पाठपुरावा केला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

