एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास विभाग नियंत्रक जबाबदार! परिवहन मंत्र्यांचा इशारा
मुंबई | मंडे टु मंडे न्यूज || महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
दोन रुपये स्वच्छता अधिभार; मग सुविधा स्वच्छ हव्यात!
एसटी प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. या रकमेच्या बदल्यात प्रवाशांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा परिणाम महामंडळाच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणतीही कुचराई होता कामा नये, असे प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांचीही जबाबदारी
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने दक्ष राहावे आणि संबंधित कंत्राटदारांकडून करारातील अटींनुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक आहे. प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात प्रशासन कमी पडल्यास संबंधित विभाग नियंत्रकांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा देण्यावर भर
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करून प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आता एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रसाधनगृहांची नियमित देखभाल आणि अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष देखरेख यावर महामंडळाचा भर राहणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

