नशिराबाद मध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा ; रिव्हॉल्वर अन् सुरा दाखवून लुटीचा प्रयत्न
नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे || जळगाव जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नशिराबाद येथे पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावरच सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री दोन अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून रिव्हॉल्वर आणि सुरा दाखवत रोकड व सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत डायल ११२ वर संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला.
नेमके काय घडले?
नशिराबाद येथील भादली रोडवरील मुक्तेश्वरनगर परिसरात पोलिस नाईक गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. कोळी हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाइकाच्या निधनामुळे अंत्यसंस्कारासाठी ते नशिराबाद येथे आले होते. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी एका संशयिताने गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्याला सुरा लावला, तर दुसऱ्याने रिव्हॉल्वर ताणून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड देण्याची मागणी केली. दरोडेखोरांनी कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली.
दरम्यान, गणेश कोळी यांच्या अंगावर सोन्याचे दागिने आणि हातात अंगठ्या असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. परिस्थिती ओळखून कोळी यांनी तातडीने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. संशयितांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला.
डायल ११२ वर केला संपर्क
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच गणेश कोळी यांनी बाथरूममधूनच डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस मदतीसाठी येत असल्याची चाहूल लागताच दोन्ही संशयितांनी तेथून पळ काढला.
पळताना दरोडेखोरांनी घरातील टेबलवर ठेवलेली कोळी यांच्या कारची चावी घेतली आणि कार घेऊन भादली रोडच्या दिशेने पसार झाले. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच त्यांनी मन्यारखेडा शिवारातील अंधारात कार सोडली आणि शेतातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, दोन्ही संशयितांचा शोध घेतला जात आहे. गणेश कोळी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कुटुंबीय सुरक्षित राहिले. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

