ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच…राज्य शासनाचे निर्देश
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबत निर्माण झालेल्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस तसेच बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. या पत्रात ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची बायोमेट्रिक व जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून१८ करण्याबाबत पूर्वीच सूचना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, हजेरीतील अनियमितता आणि गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी नितीन स. पवार यांच्या स्वाक्षरीने हे पत्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.


