मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली.या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिल जात आहेत. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे तब्बल ३० अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यापैकी २६ अर्ज मंजूर झाले होते. हा प्रकार उघडकीस आल्याने असे गैरप्रकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुन्हा होऊ नयेत यासाठी या योजनेत बदल करण्याचा राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल. यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र, आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते. मात्र, नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करु शकतात.
आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असून या योजनेतील सप्टेंबर मधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजुरी दिली जाईल.