भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

मोठी बातमी : ढाबे, हॉटेल,रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी- मांसाहारी पदार्थ वेग – वेगळे शिजवावे – अन्न औषध प्रशासन आयुक्तांचा कारवाईचा इशारा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे या मध्ये या पुढे शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असणे बंधनकारक करण्यात आली आहे. पदार्थांवर प्रक्रिया, शिजवणे वेगवेगळ्या पद्धतीत करावे, अन्यथा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे याना शाकाहारी अन्नपदार्थांची मांसाहारी अन्न पदार्थांपासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

राज्यभरातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर यावर्षी एक लाख अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

राज्यात १८९ अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त !
अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून, तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

येथे तक्रार करा !
अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा फूड सेफ्टी काँटेक्ट अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda. maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!