रावेर तालुक्यात गोवंश तस्करी, तीन गोवंशाची सुटका
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील अभोडा ते मोरव्हाल रस्त्यावर टाटा मॅजिक वाहनातून बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या तीन गोवंश प्राण्यांची रावेर पोलिसांनी ताब्यात घेत सुटका केली .या कारवाईत सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तस्कर एक बैल आणि दोन गोऱ्हे निर्दयीपणे बांधून टाटा मॅजिक वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेत होते.
रावेर पोलिसाना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ही कारवाई केली. अभोडा-मोरव्हाल रस्त्यावर सापळा रचून एमएच १५ बीजे २९४२ क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंश निर्दयीपणे बांधून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. या प्राण्यांची वाहतूक कत्तलीसाठी होत असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी वाहन, गोवंश आणि अन्य साहित्यासह एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रशीद नथ्थू तडवी (रा. मोरव्हाल ता. रावेर. याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई रावेर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल , पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील आणि इस्माईल तडवी यांच्या पथकाने केली.

