बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जिल्हा परिषदेचा तिसरा कर्मचारी निलंबित, चौथा कर्मचारीही होणार निलंबित
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याच्या दिव्यांग
सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जि.प.च्या अर्थ विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर दिव्यांगत्व तपासणी अहवालात आवश्यक त्या निकषांनुसार टक्केवारी आढळून न आल्याने यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सोमवार दि. १२ रोजी पुन्हा एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. तर अजून एका कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रस्तावावर मंगळवार दि. १३ रोजी निर्णय होणार आहे.
तीन कर्मचारी निलंबित
पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांनी बोगस दिव्यांग प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेऊन सीईओंनी त्यांचे निलंबन केले असून सोमवार दि. १२ रोजी आता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बोदवडचे वरिष्ठ सहाय्यक शंकर वसंतराव वाघमारे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
यात जीएमसी अधिष्ठाता यांनी दिलेल्या अहवालात त्यांचे दिव्यांग फक्त ३० टक्के असल्याचा अहवाल आला आहे. तर चाळीसगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी नारायण सुखदेव मोरे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार असुन त्यांचा प्रस्ताव सीईओंकडे पाठविला आहे.
६८३ दिव्यांगांपैकी ४३ दिव्यांगाची तपासणी
आतापर्यंत शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे ६८३ कर्मचाऱ्यांना पुर्नतपासणीसाठी पाठवण्यात आले असून आता पर्यंत ४३ कर्मचाऱ्यांचे अहवाल जीएमसी अधिष्ठाता यांनी जि.पकडे दिले आहे. त्यातील ४ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वात तफावत आढळून आल्याने त्यापैकी ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असुन एकाची कारवाई प्रस्तावित आहे. ६८३ पैकी बऱ्याच कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतर कारवाई होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

