सावदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड, “या” विषयांवर नरम – गरम चर्चा
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सावदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणूक पार पडली .या निवडणुकीत उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना युतीचे फिरोज खान पठाण तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्या तर्फे सिमरन वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीची अंतिम वेळ सकाळी ११.४५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती.
मात्र या वेळी भाजप शिवसेना युतीत सहभागी झालेले अपक्ष उमेदवार श्याम अकोले यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी सिमरन वानखेडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. या विनंतीला मान देत सिमरन वानखेडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. परिणामी फिरोज खान पठाण यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
त्या नंतर दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठीही निवड प्रक्रिया पार पडली. भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीतर्फे सुरज परदेशी व महेश अकोले यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र गटनेत्या सौ. रंजना भारंबे यांनी महेश अकोले यांचा अर्ज मागे घेतल्याने सुरज परदेशी यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्यातर्फे सुनील जंगले यांचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गटांकडून स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणताही वाद न होता एकमताने निर्णय झाला.
दरम्यान, नव निर्वाचित नगरसेवक राजेश वानखेडे यांनी या विशेष सभेत सावदा नगरपालिका संचलित नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिर या मुलींच्या शाळेत झालेल्या बांधकाम / ग्राउंड वैगरे संदर्भात जवळ जवळ ४७ लाख रुपयांच्या कामा विषयी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, हे काम, कोण करतंय, कुठल्या निधीतून, नगरपालिकेने याना एन ओ सी दिली आहे काय? नगरपालिकेला या बाबत काही पत्र आहे का? या विषयी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना जाब विचारला. सदरच्या कामा बाबत शाळेच्या मुख्याध्यापिका याना सुद्धा या बाबत माहिती नाही. या संदर्भात चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सभागृहात मागणी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा